सामूहिक मतदान प्रतिज्ञा उपक्रमास ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे,दि. १४(जिमाका): महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
मतदारांचा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील वाहने, संस्था आणि एजन्सीद्वारे सायरनचा वापर करण्यात आला होता. नियोजित वेळेत सामूहिक संकल्प उपक्रमात सामील होण्यासाठी सायरनने शासकीय कार्यालयात, खाजगी आस्थापनांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नागरिकांना या सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी होण्याची आठवण करुन दिली. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर 11.00 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील उत्साही मतदार, नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त व इतर सर्व पोलीस अधिकारी/ कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व त्यांचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे जिल्हा परिषद कार्यालय व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सर्व महापालिका शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदान अधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.